चेंबर फोडून पुन्हा बांधा : कंत्राटदाराची कानउघाडणी
चिस्तिया चौक ते एमजीएम रस्ता बंद पाडलेल्या तक्रारदार नागरिकांची आज अखेर आमदार अतुल सावे यांनी भेट घेऊन चर्चा केली. कंत्राटदाराची कानउघाडणी करीत ड्रेनेज चेंबरचे बांधकाम पुन्हा करण्याचे आदेश दिले. परिसरातील रहिवाशांची कोणतीही तक्रार आली तर गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार सावे यांनी दिला.
बोगस काम आणि देसरडाची धमकी अशा दुष्टचक्रात अडकलेल्या टाउन सेंटर परिसरातील रहिवाशांना तोंड दाबून बुक्क्याचा मार काय असतो याचा अनुभव गेल्या तीन-चार दिवसात आला. रस्त्यालगत व्यवसायिक प्रतिष्ठानात घुसणारे पावसाचे पाणी, घरासमोरून वाहणारे ड्रेनेजचे पाणी अशा असंख्य समस्यांनी त्रस्त असणार्या या नागरिकांनी वारंवार नगरसेविकेचे पती प्रशांत देसरडा यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र गेल्या दोन वर्षात देसरडाने या परिसराकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे रहिवाशी संतप्त झाले होते. त्यातच सिमेंट रोड च्या कामात कंत्राटदाराने बोगसगिरी केली. रहिवाशांच्या घरासमोरचे पेवर ब्लॉकच विटा म्हणून वापरले. खर्च वाचवण्यासाठी कंत्राटदाराने ही खाबूगिरी केली. त्यामुळे रहिवासी संतप्त झाले. देसरडाकडे तक्रार करण्याची कुणाची हिम्मत झाली नाही. तो सरळ मारहाण करण्याच्या धमक्या देतो, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. अखेर माध्यमांनी या प्रकाराला वाचा फोडली. तर अनेकांनी आमदार अतुल सावे यांना फोन केले.
देसरडाची पक्षातच किरकिरी!
दरम्यान रहिवाशांना दमबाजी आणि शिवीगाळ करणार्या प्रशांत देसरडा याची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. देसरडा यांच्या विरोधकांनी पद्धतशीरपणे व्हायरल झालेली धमकीची रेकॉर्डिंग प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. नेहमीच याने घाण करायची अन आम्ही निस्तरायचे काय ? असा सवाल पक्षातील नेते कार्यकर्ते करू लागले आहेत. दुसरीकडे वार्डातील नागरिकांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना फोन करीत प्रतिष्टीतांच्या वार्डात असा असभ्य उमेदवार नकोच अशी मागणी अनेकांनी पक्षाकडे केल्याचे समजते. असभ्य भाषा दमबाजीचा प्रकार मुळीच खपवून घेणार घेतला जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचे समजते.